पहिले प्रेम
शब्द गेले तुझे मला काही सांगुनी,
माझ्या मनाचा आरसा मलाच मग दाऊनी.
भास होता तो की तुझ्या प्रेमाचा गारवा होता,
तारुण्यात वाहून नेणारा तो अवकाळी पाऊस होता ।।
वेळे आधी क्लास मध्ये एकटाच मी बसून राहायचो,
तुझी एक झलक मिळताच मनामध्ये आनंदी पिसारा मी फुलवायचो.
असली तू की वेळ माझा क्षणात संपून जायचा,
नसली तू की 1-1मिन्ट माझा तासा प्रमाणे जायचा ।।
तुला बघण्यासाठी ट्युशन समोर तुझ्या लपूनछपून मी यायचो,
तुझ्या लेडीस सायकल वर क्षणभर बसून तुझा आभास मी अनुभवायचो.
तुझ्या सायकल शेजारी ही सायकल कुणाची मला मंजूर नव्हती,
कारण विठोबा संगे रुख्मिनी हीच जोडी तर माझ्या डोळ्यात होती ।।
संपली शाळा आलं कॉलेज पण तुझी साथ नाही राहिली,
तुझा तो आभास अन तुझी ती झलक शब्दातच कुठे हरविली.
संपला खेळ बाहुल्यांचा शहाणपणाचा डोंगर देखील आता आला,
शहाणी झाली माझी बाहुली पण हा बाहुला तर बहुलाच राहिला ।।
First love |
प्रेम.... म्हणावं तितकं लहान, करावं तितक मोठं आणि अनुभवाव तितकच निरंतर.
शाळेत, कॉलेजात, ट्युशन मध्ये किंवा या व्यतिरिक्त बाहेर कुठेतरी सर्वांना एक व्यक्ती नक्कीचं आवडलेली असते. कुणाला न सांगता आपण ज्यात रमू लागतो, त्या व्यक्तीचे सोबत असणे किंवा दिसणे देखील आपल्याला बेचैन करते असच ते प्रेम.
माझं पण होतं असं कुणावरतरी जिचा विचार जरी आला तरी आयुष्य सारं स्तब्ध व्हायचं माझं. आता ती त्या वयात झालेली एक मस्ती किंवा आकर्षण म्हणता येईल पण तेव्हा ते खरं प्रेम वाटायचं अगदी फ्रेंडरी मधल्या जब्या सारखं. आपण ट्युशन लावलेली नसतांना तिच्या ट्युशन जवळ यायचं मित्रांना सांगायचं की अरे तुम्हाला भेटायलाच आलो होतो आणि उगाच आपले डोळे रिचार्ज करायचे तिला बघून हे तर प्रत्येकानेच अनुभवले असेल. ती शाळेसाठी घरून केव्हा निघते, कुणासोबत येते, तिला क्लास मध्ये यायला किती टाईम लागतो या साऱ्या गोष्टी अगदी जेम्स बॉण्ड सारख्या आपल्याला ठाऊक असायच्या कारण दिनचर्या तिथूनच तर सुरू व्हायची ना. बाबांनी एखादं खेळणं आणल्यावर जसं लहान असताना आपण भाऊ/बहिन कुणालाच खेळू देत नाही त्या सोबत कारण ते आपल्या आवडीचं असतं. तसंच तिच्या शेजारी जागा आपलीच असावी मग ती सायकल असो की वर्गात तिला बघता यावे अशी जागा असो, ती आपलीच असावी असेच वाटायचे कारण ती सुद्धा आपल्या आवडीचीच ना. चुकून माझ्या कडे बघून जरी हसली तरी रिस्पॉन्स मिळतोय हे समाझण्याची तेव्हा अक्कल नव्हती.
शाळा संपली कॉलेज मध्ये गेलो म्हणजेच माझा तारुण्यात प्रवेश झाला. चेहऱ्यावर दाढिमिशी फुटू लागली, गळ्याला कंठ दिसू लागला आणि विचारांना असंख्य अशी पालवी येऊ लागली. ती पुढील शिक्षणासाठी बाहेरगावी गेली आणि माझी दिनचर्या पूर्णपणे ढासडली. आता ट्युशन समोर येणे तिला बघणे, वर्गात आधी जाऊन तिच्या येण्याची वाट बघणे ह्या साऱ्या गोष्टी नाही होणार याचा विचार करूनच माझी गोची झाली. प्रेम झालेले नसतांना देखील त्या अकर्षणाच्या दुराव्या मुळे त्रास होऊ लागला. स्वतःला समझवणे खरंच खूप कठीण, आणि स्वतःला समझ नसताना देखील प्रयत्न करणे त्याहूनही कठीण. हळू हळू कळत गेले की तरुण्याचा उंबरठा ओलांडताना सर्वांनाच होतं असं. आता वाटते की किती निरागस होतं ते सर्व काही त्यात अपेक्षा नव्हती की तिने सुद्धा माझ्या बद्दल तसाच विचार करावा. एकतर्फी असतांना देखील त्याला नाव एकतर्फी नव्हते कारण हे सारकाही समझण्याची तेव्हा कुठे एवढी अक्कल. आज जेव्हा तिला मी ह्या गोष्टी सांगतो तिच्या तोंडून फक्त एवढंच निघतं " बावरटच आहेस तू आधी पासून "
पहिले प्रेम |
तो पोरकटपणा इतका छान वाटायचा की बालपण कधी जाऊच नये, आयुष्य हे दहावी/बारावी पर्यंतच पुन्हा पुन्हा यावे असे आता वाटते. कारण नंतर चे आयुष्य हे दगदगीचे, स्वतःला कुठेतरी सिद्ध करण्याचे, घरखर्चात आपले योगदान देण्याचे आणि पैसा-वैभव मिळविण्यातच जाते. म्हणून तर म्हणतात ना.
" लहानपण दे गा देवा
मुंगी साखरेचा रवा "
- © केतन रमेश झनके