डॉ. भीमराव रामजी आंबेडकर
अस्पृश्यतेच्या अमावस्येला विद्येचा चंद्र मिळाला,
प्रकाशमय करण्या आयुष्य दलितांचे बाबासाहेबांचा जन्म झाला.
विद्येचा तो अथांग सागर मायेचा असंख्य साठा,
भारताच्या रचने मधला त्याचा मोलाचा सोनेरी वाटा.
काय अवस्था ती होती जिथे जगण्याची सोय नव्हती,
झाडू कमरेला अन गळ्यात गाडगं गुलामीची हिच रीत होती.
जातीच्या उच-निचते मध्ये शिकण्याची ही जिथे मुभा नव्हती,
तोडीले बंधने त्याने जातीयतेची त्याला गुलामी अशी मंजूर नव्हती.
न्याय दिला गरिबांना, हक्क दिला महिलांना,
उभे राहण्या सामर्थ्य त्याने दिले विकलांगांना.
उपकार त्याचे फेडण्या हा जन्म पुरा नाही,
या देशाला लाभली लेखणी भीमाची पुन्हा असा घटनाकार होणे नाही.
आज बघतो जेव्हा वास्तविकता कीव मला येतो,
घराणेशाही आणि हिंदुत्वाच्या राजकारणात जेव्हा जीव गुदमरतो.
देशाच्या सैनिकावरही जेव्हा राजकारण इथे होते,
वाटते बरे झाले हे बघण्या फुले, शाहू, आंबेडकर नव्हते.
असते बाबासाहेब तर आज हा भारत कुठे असता,
जगात अभिमानाची फक्त तिरंग्याचीच असती सत्ता.
दिसले सर्वांना फक्त सवलत(Reservation) देणारे बाबासाहेब, बाकी कार्य त्यांचे तुम्ही वाचलेच नाही,
1) महिलांना मताचा व समानतेचा अधिकार, गरोदर महिलांना Maternity leave, हिंदू कोड बिल.
2) कामगारांना वैद्यकीय रजा, PF, ESI.
3) शेतकऱ्यांना आधुनिक शेतीसाठी वीज आणि पाणीपुरवठा, खोती पद्धती पासून मुक्तता.
4) भारताला अर्थव्यवस्थेसाठी RBI.
हे बाबासाहेबांची देण आहे कुण्या काँग्रेस-भाजपाची नाही.
- © केतन रमेश झनके
दैनिक सम्राटच्या विविध अंकातून डॉ. बाबासाहेबांच्या कार्याचा आढावा मी घेतला व खालील मचकुर हा डॉ. बाबासाहेबांच्या कार्याचा लेख आहे. कविता आवडली असेल तर कृपया हा लेख सुद्धा वाचा डॉ. बाबासाहेबांचे कार्य सर्वाना माहित असणे आवश्यक आहे.
आधुनिक भारताचा जनक, महत्वाकांक्षी, धाडसी, जनहितदक्ष, महानायक, न्यायाचा कडवा रक्षक, स्त्रियांचा कैवारी, दलितांचा भाग्यविधाता, अतिउच्च पदव्यांचा एकनिष्ठ साधक, धुरंदर राजकारणी, निस्सीम देशभक्त, श्रेष्ठ ग्रंथकार, समाजभिमुक पत्रकार, श्रेष्ठ मार्गदर्शक, राज्यघटनेचा शिल्पकार, बोधिसत्व, महामानव म्हणजेच डॉ. भीमराव रामजी आंबेडकर. त्यांना समाजशास्त्र, राज्यशास्त्र, धर्मशास्त्र, नितीशास्त्र, मानववंशशास्त्र पारंगत होतेच शिवाय ते विद्वान पंडित आणि कायदेतज्ज्ञ होते. मराठी, पाली,इंग्रजी, संसकृत, हिंदी, जर्मन, गुजराती, पर्शियन या सर्व भाषांचे ज्ञान त्यांना अवगत होते. पुस्तकांसाठी घर बांधणारे डॉ. बाबासाहेब हे पहिले व्यक्ती, त्यांनी बांधलेल्या राजगृह हा जगातील सर्वात मोठा वयक्तिक ग्रंथालय आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे कुठल्या विविष्ट जातीसाठी किंवा समुदायसाठी काम करणारे नेते नव्हते. त्यांचे कार्य वाचल्यावर तुम्हाला हे लक्षात येईल की त्यांची भारताला देणगी फक्त संविधान एवढीच नव्हती, स्वतंत्र भारताच्या उभारणी मध्ये डॉ. बाबासाहेबांचे योगदान हे मोलाचे आहे. शेती असो वा उद्योग, वीजनिर्मिती असो वा जलसंधारण, कामगारांचे प्रश्न असो वा महिलांचे सर्व पुनर्निर्माण डॉ.बाबासाहेबांनी केले आहेत. Reserve bank of india ची संकल्पना हि बाबासाहेबांच्या " The problem of the rupee " या ग्रंथा द्वारे झाली आहे आणि भारताच्या चालनावर गांधीजींचा फोटो येतो. रवींद्रनाथ टागोर यांना SBI चा Founding father म्हटल्या जाते मला प्रश्न पडतो काय संबंध या दोघांचा भारताच्या अर्थव्यवस्थेच्या कामामध्ये. योगदान डॉ.बाबासाहेबांचं आणि नाव कुण्या दुसऱ्याचं. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महात्मा ज्योतिबाफुले, छत्रपती शाहू महाराज, संत कबीर हे डॉ. बाबासाहेबांचे प्रेरणास्थान. महात्मा ज्योतिबाफुले यांना ते आपले गुरु म्हणायचे. या सर्व थोर व्यक्तींचा खरा वारसदार डॉ. बाबासाहेब आंबेडकर हेच होते कारण त्यांच्या शिकावणीतून समाजाचा उद्धार हा डॉ. बाबसाहेबांनीच केला.
महिलांसाठी केलेले कार्य:
डॉ. बाबासाहेब 3 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री झाले. डॉ. बाबासाहेबांनी हिंदु कोडबिल हा कायदा ठाम आणि आक्रमकपणे मांडला. या कायद्या नुसार महिलांना वडिलांच्या संपत्तीमध्ये हिस्सा, मुलींना दत्तक घेण्याचा अधिकार, महिलांना आंतरजातीय विवाहाचा हक्क, सरकारी नौकरीत महिलांना आरक्षण, गरोदर महिलांना वैदयकिय रजा, महिलांना मतदानाचा अधिकार, समान कामासाठी समान वेतन मिळाले. पुरुषांना अनेक विवाह करण्यावर बंदी घालण्यात आली त्यामुळे स्त्री-पुरुष समता आली. स्त्रियांविरोधातले सर्व कायदे नष्ट करण्यात आले. या कायद्यामुळे अनेक वर्षे गुलामीच्या बेडीत अटकलेल्या स्त्रियांची मुक्तता झाली आणि समाजक्रांती आली. आज खऱ्या अर्थाने पाहिले तर स्त्रियांना स्वतंत्रपणे जगण्याचा हक्कच बाबासाहेबांनी दिलाय. जुन्या रूढी-परंपरांमध्ये जिथे स्त्रियांचा जन्म फक्त पतीची सेवा आणि घर सांभाळण्यासाठी व्हायचा, तिथे आजची स्त्री उच्च शिक्षण घेऊ शकते, पुरुषयांप्रमाणे स्वबळावर नौकरी करू शकते.डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे की, " मी स्त्रियांच्या स्वातंत्र्याच्या बाजूने आहे. राज्यघटनेपेक्षाही मला हिंदू कोडबिल जास्त महत्वाचे वाटते ".
आश्चर्याची बाब हि आहे की स्त्रियांसाठी मांडलेल्या या कायद्याला सरदार पटेल, डॉ.राजेंद्र प्रसाद आणि अश्या बऱ्याच सनातन राजनेत्यांनी विरोध दर्सविला होता. हिंदू कोडबिलचा कायदा लवकरात लवकर बनावा आणि स्त्रियांना हक्क मिळावे या साठी डॉ. बाबासाहेबानी मंत्रिपदाचा सुद्धा राजीनामा दिला होता. डॉ.बाबासाहेबांच्या या अथांग परिश्रमाची आणि त्यागाची जाणीव सर्व स्त्रियांनी ठेवावी, कारण आज डॉ. बाबासाहेबांचा कायदा नसता तर अवस्था स्त्रियांची तीच असती जी स्वातंत्र्यापूर्वी होती.
कामगारांसाठी केलेले कार्य:
डॉ. बाबासाहेब मजूरमंत्री असतांना त्यांनी कामगारांसाठी केलेल्या अनेक कार्यामुळे आज कामगार स्वाभिमानाने जगू शकतोय. पुर्वी कामाचे तास ज्याला आपण shift म्हणतो ती 14 तासांची असायची, कामगारांचे आयुष्य एका गुलामा पलीकडे काहीच नव्हते जो 2 वेळेचं जेवण करण्यासाठी राबायचा. डॉ. बाबासाहेबांनी 8 तासाची shift केली, काम जास्त केले तर आज जो ओव्हरटाईम (OT) मिळतो ती बाबासाहेबांची देण आहे. आठवड्यातून एक दिवस सुट्टी बंधनकारक केली, जर सुट्टीच्या दिवशी काम केले तर त्याचा वेगळा भत्ता. प्रोवेडीएन्ट फंड(PF) जो रिटायरमेंट नंतर आपल्या जगण्याचा आधार बनतो ती सुद्धा डॉ. बाबासाहेबांची देण. आज कामात उपभोगत असलेले ट्रावेलिंग ऑलॉवन्स (TA), डिअरनेस ऑलॉवन्स (DA), कर्मचारी राज्य विमा (ESI) हे सगळं बाबासाहेबांनी दिलेली कामगारांना भेट आहे. महिलांना प्रसूतीच्या काळात भरपगारी रजा, बेरोजगार कामगारांसाठी सेवा योजना कार्यालय (Employment exchange), सरकारी कामगारांना पेन्शन (pension). असा कुठलाच क्षेत्र नाही जिथे या महामानवाच योगदान नाही.दुर्दव असे आहे की आज याची जाणीव ठेवणारे कमी आणि माहित नसतांना विटंबना करणारे अनेक सापडतात, कारण डॉ. बाबासाहेब यांचे विचार आणि कार्य हे भारतीयांसमोर येऊच दिले नाही. भारताला येणाऱ्या प्रत्येक समस्येवर हयातीत असतांना डॉ. बाबासाहेबानी उपाययोजना करून ठेवल्या आहेत. मग तो शेतकऱ्यांचा प्रश्न असो वा दुष्काळाचा, संरक्षणाचा प्रश्न असो की अर्थव्यवस्थेचा, न्यायव्यवस्थेचा प्रश्न असो की औद्योगिकर्णाचा. त्यांचे तत्वांचा आधार घेत प्रत्येक परिस्तिथीला मात देता येईल अशी दूरदृष्टी त्याची आजही कामी येत आहे.
ऊर्जा आणि जल नियोजनाचे शिल्पकार:
भारत हा कृषिप्रधान देश आहे, भारताची अर्थव्यवस्था हि कृषिप्रधान आहे. इथे शेती ही पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे आणि पाऊस नाही आला तर दुष्काळाचे सावट अटल आहे. भारतामध्ये एकिकडे खूप पाऊस पडतो, एकिकडे दुष्काळ दर वर्षी राहतो. कुठे नद्यांना पाणीच नसते कुठे खूप पूर येतो.1942 साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जल, विद्युत आणि मजूरमंत्री म्हणून सूत्रे हातात घेतली. जिथे पाणी नाही तिथे नदीजोड प्रकल्पाद्वारे पाणी पोचवण्याची कल्पना त्यांनी त्या काळात ठेवली. पाण्याचा साठा ठेवण्यासाठी पाणी अडवणे महत्वाचे आहे हे प्रथम उदगार काढणारे डॉ .बाबासाहेब आंबेडकर होते. अवघ्या 4 वरश्यात त्यांनी 15 धरणांची blueprint तयार केली होती. हिराकुंड आणि दामोदर हे प्रकल्प त्यांच्या कारकीर्दीतले पुरावे आहेत ज्यामुळे पंजाब प्रांताचा विकास झाला आणि ओडीसा राज्याची खऱ्या अर्थाने विकासास प्रारंभ झाला. पूर येणाऱ्या नद्यांना दुष्काळ भागात जोडल्याने पाण्याची कमतरता कुठेच भासणार नाही आणि वीजनिर्मिती हि केल्या जाईल अशी त्यांची संकल्पना होती. औद्योगिकरणासाठी जल आणि विद्युत खूप महत्त्वाची आहे त्यासाठी धरण बांधून पाणी अडवाव आणि विद्युत निर्मिती करावी त्यांच्या या कल्पनेने भारताच्या निर्माणाच्या पाया रचला
दुर्भाग्य असे भारताचे की असा विद्वान व्यक्ती असतांना त्यांच्या निओजनांना आणि दुरदृष्टीला तेव्हा दुर्लक्षित केल्या गेले. आज महाराष्ट्रात भीषण दुष्काळ आहे, पीक नसल्यामुळे कर्जपोटी शेतकरी आत्महत्येचे प्रमाण दरवर्षी वाढतच आहे. लोहमार्गापेक्षा जलवाहतूक सोयीची आणि परवडणारी आहे हे बोलणारे पहिले व्यक्ती बाबासाहेब होते, 2 वर्षाआधी या गोष्टीची दखल माननीय नितीनजी गडकरी यांनी घेतली. आज उद्योग क्षेत्रात त्याचा फायदा दिसू लागला.
डॉ.बाबासाहेबांनी मांडलेल्या प्रकल्पाची दक्षता तेव्हा जर घेतल्या गेली असती तर आज भारताला पाणी आणि विजेच्या उपलब्धतेमुळे औधोगिकीकरनाला वेग आला असता, आणि टँकरच्या रांगेत bucket घेऊन उभे राहण्याची वेळ नसती आली. ग्रामीण भागात 3-4km लांबून डोक्यावर हांडा घेऊन येतांना कुणी नसतं दिसलं.
शेतकऱ्यांसाठी केलेलं कार्य:
कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी व कुलाबा (आता रायगड) या जिल्ह्यांमध्ये खोतीपद्धती प्रचलित होतो. खोतीपद्धती मध्ये गावातील खोत (जमिनदार) गावातील जमिनीवर हक्क गाजवत असे. तो मराठा, कुणबी, आगरी, महार आदी जातीतील कुळांकडुन शेती करून घेत असे, या मुळे वर्षानुवर्षे अमानुषपणे पिळवणूक होत होती. त्याकरिता खोतास सरकारकडून मुशाहिरा मिळत होता. म्हणजेच तेव्हाचे सरकारही अश्या गुलामगिरी ला पाठिंबा द्यायची. आज ज्यांच्या नावाचा आपण जयजयकार करतो अश्याराजनेत्यांनी खरी तोंडं आपल्याला बघायलाच नाही दिले कधीच. बाबासाहेबानी संसदेत बिल मांडलं खोत पद्धती नष्ट करण्यासाठी त्यांना नेहमी प्रमाणे नाकारण्यात आले. पण डॉ.बाबासाहेबांची धाडसी वृत्ती अपराजित होती, कित्येक आंदोलने केली, नारे दिले. कित्येक वर्षे गुलामीत अटकलेल्या कुळांना कुठेतरी आता सुटकेचा स्वास् देणारा कैवारी आला हे शेतकऱ्यांच्या लक्षात आले आणि त्यांनी डॉ. बाबसाहेबांसोबत आंदोलनात सहभाग घेतला. त्यांच्यावर अनेक अमानुष अत्याचार करण्यात आले, पिण्याचे पाणी बंद केले, मारहाण करण्यात आली, बहिष्कार टाकण्यात आला पण खंबीरपणे शेतकऱ्यांनी बाबासाहेबांना साथ दिली आणि शेवटी खोतीपद्धती बंद करण्यात आली. सरदार पटेल ह्यांनी त्यावेळी खोतीपद्धतीला पाठिंबा दिला होता आणि जमीनदारांना आश्वासन हि दिले होते त्याबद्दल हे विशेष.
डॉ. बाबासाहेबांनी मांडलेल्या नदीजोड प्रकल्पाचे फायदे हे शेतीसाठी महत्वाचे होते. आज हे हाल शेतकऱ्याचे नसते झाले, आजचा शेतकरी हा समृद्ध असता. डॉ.बाबासाहेबांच्या कार्याला नेहमीच दुर्लक्षित केल्या गेलय, त्यांच्या निओजनाने आजचा भारत जगातली महासत्ता असता. जगातील सर्वात विद्वान अर्थतज्ज्ञ या भारताला लाभला पण मंत्रिमंडळात त्यांना कधीच अर्थमंत्रीपद नाही दिले.
Lord_Buddha |
डॉ.बाबासाहेबांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत सर्व क्षेत्रात कामे केलीत, म्हणून त्यांना भारतरत्नच नव्हे तर विश्वरत्न म्हटल्या जातं. कोलंबिया युनिव्हर्सिटीचा सर्वात विद्वान विद्यार्थी म्हणून डॉ.बाबासाहेबांना ओळखल्या जातं, त्यांच्या जीवनावर लिहलेली पुस्तके हे कोलंबिया युनिव्हर्सिटीच्या अभ्यासक्रमात वापरली जातात. डॉ.बाबासाहेबांना कित्येक देशांनी आपल्या देशाचे नागरिक होण्यास विचारले, त्यांची बुद्धी इतकी तेज होती की त्याची किंमत कित्येकांनी लावू पाहली. पैसे आणि स्वतःचे वैभव बघायचे असते तर बाबासाहेब केव्हाच भारतातून गेले असते पण तो खरा देशभक्त होता ज्याने देशाला अर्पण होणे आणि दिन-दुबळ्यांना आधार देणे गरजेचे समझले. त्यांची शिकवण आत्मसात करणे आणि त्यांच्या कार्याची दखल घेणे आज अत्यंत आवश्यक आहे, याला कुठल्या जातीधर्माचे बंधने नाहीत कारण त्यांनी कार्य भारतीयांसाठी केले कुण्या एका समुदायासाठी नाही.
म्हणून तर प्रख्यातकवि वामनदादा कर्डक म्हणतात
" भिमा तुझ्या मताचे जर पाच लोक असते,
तलवारीचे तयांच्या न्यारेच टोक असते ".
अश्या या देशभक्ताला, विद्येच्या अथांग सागराला, आमच्या मुक्तिदात्याला माझी ही शब्दसुमनांची आदरांजली मी अर्पण करतो.