ये रे ये रे पाऊसा
किती आग ओकतो किती त्रास तुझा रे सूर्या,गणपतीबाप्पा आधी आजकाल आम्हा तुझाच करावा लागतो मोर्या.
४ महिन्यांचा करार ना तुझा मग आता ८ महिने का तू छळतोस,
सकाळी ७ला येऊन रात्री ७ला जातो का इतकी ओव्हर ड्युटी करतोस.
तुझी व्याख्या आजकाल गब्बर सारखीच झाली,
तू येणार ऐकताच आम्ही लपून लपून राहतो.
त्याची दहशत तरी ५०कोसच दूर होती,
तू तर अक्खा भारतभर दहशत करतोस.
तुला बोलून तरी काय फायदा चूक तर आमचीच आहे,
दुष्परिणामांची जाणीव असतांना प्रदूषण करणारी विकृत बुद्धी तर आमचीच आहे.
झाडे कापलीत आम्ही स्वार्थासाठी आणि पाण्यासाठी आता रडतो,
निसर्गाची अवहेलना केल्यावर कुठे अनर्थ टळतो.
अजूनही वेळ आहे सावध आताच होण्याची,
प्रदूषणावर नियंत्रण आणि झाडे खूप जगवायची.
हे आपले कर्तव्य आहे यात शासनाच्या पुढाकाराची वाट का बघायची,
नाहीतर दूर नाही तो दिवस काळ्या मातीचा वाळवंट होण्याची.
ये रे ये रे पाऊसा तुला देतो पैसा,
पैसा खरा होईना पाऊस काही येईना,
पाऊस म्हणे झाडे लाव,
भिजेल मग चिंब तुझे गाव.
पाळण्या पासून तिरडीपर्यंत झाडंच तर तुझा कैवारी,
वृक्षारोपणचा घे तू वसा सुखी राहील तुझी पिढी येणारी.
चला मग एक निर्धार करू किमान १झाड तरी या पावसाळ्यात जगवू,
तापून उठलेल्या या सूर्याची आग झाडाच्या थंड वाऱ्याने विझवू.
उद्याची पिढी निदान आपले अनुकरण तरी करणार,
पुन्हा उष्णतेच्या प्रभावाने कुणी तर नाही ना मरणार.
- ©केतन रमेश झनके
एक काळ होता जेव्हा ऋतू हे ४ महिन्यांचे असतात असे शिकवले जायचे. आज स्थिती तर अशी झाली आहे की उन्हाळा ८ महिने असतो आणि पावसाळा-हिवाळा उरलेल्या ४ महिन्यात ऍडजस्ट करून घेतात. याला कारण ही तितकेच सरळ आहे प्रदूषण आणि वृक्ष तोड. दरवर्षी ऐकायला मिळतं अमुक अमुक ठिकाणी उष्णतेमुळे इसमाचा मृत्यू. ग्रामीण भागात तर परिस्थिती आणखीच गंभीर आहे, २-३km लांबून पाणी आणावे लागते. कित्येक जनावरांचा मृत्यू होतो, स्वतःसाठी पुरेसे पाणी नसताना गूराढोरांची तरी सोय कशी करणार. विचार येतो कधी कधी उद्याचं चित्र कसं असेल. आज भागत आहे म्हणून आपण विचार नाही करत किंवा दुर्लक्ष करतो, पण खरंच उद्या काय असेल परिस्थिती एक वेळा अवश्य विचार करा.